दत्त प्रार्थना - दत्तात्रय गुरु तुम्हीच ना?


दत्त प्रार्थना - दत्तात्रय गुरु तुम्हीच ना? 


जगद्वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना? ।
अनन्य भावेशंरणांगत मी, भवभय वारण तुम्हीच ना?।। धृ।। 
कार्तवीर्य यदु परशुरामही, प्रबोधिले गुरु तुम्हीच ना?।
स्वामि जनार्दन एकनाथ तरि, कृतार्थ केले तुम्हीच ना? ।
नवनारायण सनाथ करूनी, पंथ निर्मिला तुम्हीच ना? ।
मच्छिंद्रादी जति प्रवृत्त केले, जन उद्धार तुम्हीच ना? ।
दासोपंता घरी रंगले, परमानंदे तुम्हीच ना? ।
नाथ सनदिचे चोपदार तरि, श्रीगुरु दत्ता तुम्हीच ना? ।
युगायुगी निजभक्त रक्षणा, अवतरता गुरु तुम्हीच ना? ।
बालन्मत्त पिशाच्य वृत्ती, धारण करता तुम्हीच ना? ।।

स्नान काशिपुरी चंदन पंढरी, संध्या सागरी तुम्हीच ना? ।
करुनी भिक्षा करविरी भोजन, पांचाळेश्वरि तुम्हीच ना? ।
तुळजापुरि कर शुद्धि तांबुल, निद्रा माहुरि तुम्हीच ना? ।
करुनि समाधी मग्न निरंतर, गिरनारी गुरु तुम्हीच ना? ।
विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले, पीठापुरि गुरु तुम्हीच ना? ।
श्रीपादवल्लभ नरसिंह सरस्वती, करंजनगरि तुम्हीच ना? ।
जन्मताच ओंकार जपोनी, मौन धरियेले तुम्हीच ना? ।
मौजी बंधनि वेद वदोनी, जननि सुखविली तुम्हीच ना? ।।

चतुर्थाश्रम जीर्णोद्धारा, आश्रम घेऊनी तुम्हीच ना?।
कृष्ण सरस्वती सद्गुरु वंदुनि, तीर्थ गमले तुम्हीच ना?।
माधवारण्य कृतार्थ केला, आश्रम देउनि तुम्हीच ना?।
पोटशुळाचि व्यथा हरोनी, विप्र सुखविला तुम्हीच ना?।
वेल उपटूनी विप्रा दिधला, हेमकुंभ गुरु तुम्हीच ना?।
तस्कर वधूनी विप्र रक्षिला, भक्तवत्सला तुम्हीच ना?।
विप्रस्त्रयेचा पुत्र उठविला, निष्ठा देखुनी तुम्हीच ना?।
हीन जिव्हा वेदपाठि केला, सजिव करूनी तुम्हीच ना?।। 

वाडी नरसिंह औदुंबरिही, वास्तव्य करूनी तुम्हीच ना?।। 
भीमा अमरजा संगमि आले, गाणगापुरी गुरु तुम्हीच ना?।
ब्रम्हमुहूर्ती संगमस्थानी, अनुष्ठानि रती तुम्हीच ना?।
भिक्षा ग्रामीण करुनी राहता, माध्यान्ही मठि तुम्हीच ना?।
ब्रह्मराक्षसा मोक्ष देऊनी, उध्दारिले मठि तुम्हीच ना?। 
वांझ महिषी दुभविले, फुलविले शुष्क काष्ठ गुरु तुम्हीच ना?
नंदीनामा कुष्ठी केला, दिव्य देहि गुरु तुम्हीच ना?। 
त्रिविक्रमा विश्वरुप दाऊनि, कुमशी ग्रामीण तुम्हीच ना?।। 

अगणित दिधले धान्य कापूनी, शुद्रशेत गुरु तुम्हीच ना?।
रत्नाईचे कुष्ठ दवडिले, तीर्थ वर्णित तुम्हीच ना?।
आठहि ग्रामीण भिक्षा केली, दिवाळी दिनी तुम्हीच ना?।
भास्कर हस्ते चार सहस्रा, भोजन दिधले तुम्हीच ना?।
निमिषमात्रे तंतुक नेला, श्रीशैल्यासी तुम्हीच ना?।
सायंदेवा काशीयात्रा, दाखविली गुरु तुम्हीच ना?।
चांडाळ मुखी वेद वदविले, गर्व हराया तुम्हीच ना?।साठ वर्षे वांझेसी दिधले, कन्या पुत्रही तुम्हीच ना?।।

कृतार्थ केला मानस पुजनी, नर केसरी गुरु तुम्हीच ना?।
माहुरचा सतिपती उठवोनी, धर्म कथियला तुम्हीच ना?।
रजकाचा यवनराज बनवुनी, उद्धरिला गुरु तुम्हीच ना?।
अनन्यभावे भजता सेवक, तरतिल वदले तुम्हीच ना?।
कर्दळीवनिचा बहाना करूनि, गाणगापुरी स्थित तुम्हीच ना?
निर्गुण पादुका दृष्य ठेऊनी, गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना?।
विठामाईचा दास मूढ परि, अंगिकारिला तुम्हीच ना?।
आत्मचिंतन रमवा निशीदिनी, दिनानाथ गुरु तुम्हीच ना?।। 


।। अवधुत चिंतन श्रीगुरुदेव दत्त।। 

Comments

Popular posts from this blog

स्वामी चरित्र अवतणिका. Swami Charitra Avatarnika .The Spiritual Indians

रात्रीसुक्तं/अथ तन्त्रोक्त रात्रीसूक्तम्

मारुतीची आरती व स्तोत्र | Maruti Aarti ani Maruti Stotra| The Spiritual Indians