अपरा एकादशी कथा मराठी और हिंदी
अपरा एकादशी कथा मराठी और हिंदी
श्रीगुरुदेवदत्त
**वैशाख कृष्ण एकादशी..*.
*अपरा एकादशी.*.
||श्रीगोपालकृष्णायनमः||
राजा युधिष्ठिर भगवान् श्रीकृष्णांची भेट झाली असतांना भगवच्चरणांना वंदन करून, वैशाख कृष्ण एकादशीचें माहात्म्य काय,असा प्रश्न करितात.
भगवान म्हणतात:
राजा,या एकादशीला 'अपरा' असें नाव आहे.अपार फल देणारी अशी ही एकादशी होय.ब्रह्महत्या, भ्रूणहत्या,गोत्रवध, परनिंदा,परस्त्रीसंग,इ.महान पातकांचाही या एकादशीच्या व्रताचरणानें नाश होतो.असत्य भाषण,खोटी साक्ष देणें,वेदविक्रय, ज्योतिषशास्त्र समजत नसता भोळ्याभाबड्या लोकांना ज्योतिष सांगून फसवणे,या पातकांमुळे निरयगती प्राप्त होते, पण या एकादशीच्या व्रताचरणानें सद्गती लाभते.
चारही वर्णांच्या लोकांनीं स्वधर्मानुसार वागावे, असे शास्त्र सांगते. परंतु तसे न वागता स्वैराचार करणार्यां लोकांनाही ह्या एकादशीच्या व्रताचरणानें धर्मश्रद्धा उत्पन्न होऊन कल्याण साधून जाते.
या एकादशीचा महिमा काय वर्णन करावा!
गुरुद्रोहासारख्या पातकांचेही नाशन करण्याचें सामर्थ्य या एकादशी मध्ये आहे.
कार्तिकमासांत पुष्कर तीर्थांत त्रिकाल स्नान,गयेच्या ठिकाणी पिंडदान केले असतां, सिंहस्थ गुरु असताना गोदावरीचे स्नान करून,कुंभसंक्रांतीमध्ये केदार क्षेत्राचे दर्शन, सूर्यग्रहणामध्ये कुरु क्षेत्रामध्ये स्नान,दान,इ.पुण्यकर्म केले असतां, गाय प्रसूत होत असतां तिचे दान केले असतां,जे श्रेष्ठ फल मानवाला मिळते, तेंच या एकादशीच्या व्रताचरणानें लाभते.
पापरुप वृक्षाला तोडणारी जणू कुर्हाडच!!
अथवा पापरुपी वनाचा नाश करणारा दावाग्नीच!!
पापरुपी अंध:काराचा नाश करणारा सूर्यच!!
अथवा पापरुप हरिणाचा नाश करणारा सिंहच!!
असा या व्रताचा महिमा आहे.
श्रीकृष्ण म्हणतात: राजा, ज्याने या एकादशीचे व्रताचरण केले नाही तो केवळ पापरुपी,मरण्याकरतांच जन्माला आला.पाण्यावर बुडबुडा यावा व पुन्हां विरुन जावा त्याप्रमाणे त्याचे जिणे होय.
अतएव या एकादशीला उपोषण करुन त्रिविक्रम देवतेचे पूजन करावे.अहोरात्र भगवद्भक्ति साधावी.अशा रितीने हे व्रत घडले असतां जन्मजन्मांतरीचे पातकें जळून जातात व देहांती परम पदाचा लाभ होतो.
अशा प्रकारचे हे व्रतमाहात्म्य लोककल्याणार्थ तुला सांगितले.याकरतां इहपरलोकी सुख प्राप्त व्हावे अशी इच्छा करणारांनी हे व्रत अवश्य आचरण करुन भगवत्-अनुग्रह साधावा.इतर कोणतेंही साधन न साधतां या एकादशीच्या व्रताचरणानें अभ्युदय-नि:श्रेयस् साधून जाईल.
||अपरा एकादशी माहात्म्यं
संपूर्णम्||
Comments
Post a Comment